शेती म्हणजे, अन्न, गवत, कापडाचे तंतू, प्राणी, मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन.

शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारांत बदल होतात. मानवी जीवनात शेती हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकांवर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि तीळ व उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तऱ्हेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.

पिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात; पण या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणि पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणि पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशांत ⇨ दुर्जल शेती किंवा जिराईत शेतीशिवाय पर्याय नसतो.

आर्थिक घटक निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरून कोणत्या भूप्रदेशात काय पिकविता येणे शक्य आहे ते सांगता येईल; परंतु कोणती पिके अगर शेतीचा प्रकार किती फायदेशीर होईल ते सांगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक घटकांवरून ठरवावे लागेल. हे घटक म्हणजे उत्पादन खर्च, विक्री खर्च, दुसऱ्या उद्योगधंद्याशी स्पर्धा, शेती उत्पादनाच्या सापेक्ष किंमतीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यांचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठांच्या विशिष्ट मागण्या, जमिनीच्या किंमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग आणि वैयक्तिक घटक वगैरे. त्यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे प्रकार नियोजित केले जातात. त्यातील काही महत्त्त्वा प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत.

एकेरी अगर बहुविध पिकांची शेती एकेरी पिकाची शेती भारतात फार रूढ नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरनिर्वाहाच्या हेतूने करण्यात येणारी असून शेकऱ्याचे जमीनधारणेचे परिमाण अल्प आहे. शेतकऱ्याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सर्व प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवामान, काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक ठिकाणी वर्षभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण विभागातील भात शेती हा एकच आणि जवळजवळ एकेरी पीक पद्घतीसारखा आहे. अमेरिकेसारख्या देशात जमीनधारणेचे परिमाण खूप मोठे असून विशेषीकरणही उच्च दर्जाचे असते. तेथे गहू, कपाशी, मका, गवत इत्यादींची एकेरी पीक पद्घत रूढ आहे. अर्थात तेथील हवामान बाराही महिने शेतीला पूरक नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. जेथे शेतीचे लहानलहान तुकडे एकत्र करून सामुदायिक शेती अस्तित्वात आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळाप्रमाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली शेती केली जाते, अशा ठिकाणी एकेरी पीक पद्घती अवलंबिली जाते.

बहुविध पिकांची शेती अनेक दृष्टींनी फायदेशीर असते. तिच्यामध्ये उपलब्ध साधनसामगीचा अधिक कार्यक्षमतेने आणि काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनक्षमता टिकविण्याच्या किंवा वाढविण्याच्या बाबतीतही तिची मदत होते. बहुविध पिकांच्या शेतीत काही पिकांत आलेले नुकसान दुसऱ्या पिकांत भरून निघत असल्याने काही प्रमाणांत नुकसानभरपाई होते. मात्र एकेरी पिकांच्या शेतीत विशेषीकरणाचा जो फायदा मिळतो तो बहुविध पिकांच्या शेतीत मिळत नाही.